शिरुर अनंतपाळ : राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना करण्यात येत आहेत. दरम्यान, सोमवारी येथील महात्मा बसवेश्वर चौकात विनामास्क फिरणाऱ्या ४० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन चार हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शासनाने मी जबाबदार ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून येथील तहसीलदार अतुल जटाळे यांनी नायब तहसीलदार सुधीर बिरादार, आर.एन. पत्रिके यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय कोविड नियंत्रण पथकाची बैठक घेऊन या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, विनाकारण फिरू करणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, अशा सूचना केल्या. या सूचनांची जनजागृती करून त्याची अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.
सोमवारी येथील नगरपंचायत कोविड नियंत्रण पथकाच्या वतीने महात्मा बसवेश्वर चौकात दंडात्मक कारवाई करण्यात आली. ४० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांना धसका बसला आहे.
दंडात्मक कारवाई सुरूच राहणार...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दंडात्मक कारवाईची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. व्यापारी, नोकरांनीही मास्कचा वापर करावा म्हणून दंड आकारण्यात आला आहे. पहिल्या दिवशी ४ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहन नायब तहसीलदार बिरादार यांनी केले. कोविड नियंत्रण पथकाद्वारे दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचे नगरपंचायत पथकाच्या वतीने सचिन भुजबळ, ज्योती वलांडे गायकवाड, वाले यांनी सांगितले.