लातूर: जिल्ह्यामध्ये नाफेडची एकूण १६ हमीभाव केंद्र सुरू आहेत. या केंद्रावर मार्चअखेरपर्यंत ५१ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आहे. ३ हजार २६५ शेतकऱ्यांचा हरभरा ५ हजार ३३५ रुपये क्विंटल, याप्रमाणे खरेदी करण्यात आला असून, याची एकूण खरेदी किंमत २७ कोटी २२ लाख १८२ रुपये आहे. या खरेदीपैकी सात कोटी १७ लाख ९८ हजार रुपये पेमेंट शासनाकडून नाफेडला प्राप्त झाले असून, संबंधित शेतकऱ्यांना बुधवारी दिले जाणार आहे. पहिल्यांदा ज्या सेंटरवरून खरेदी झालेली आहे. त्या सेंटरवरील शेतकऱ्यांना पेमेंट केले जाणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी विलास सोमारे यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये हरभऱ्याचा दर ४ हजार ७८० रुपये प्रति क्विंटल आहे, तर हमीभाव यापेक्षा अधिक असल्याने, यंदा हमीभाव केंद्रावर हरभरा देण्यास शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. त्यानुसार, नाफेडकडून हरभऱ्याची नोंदणी झाली. गेल्या पंधरा दिवसांमध्ये ५१ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. प्रारंभी ज्या केंद्रावरून हरभरा खरेदी झाला. त्या हरभऱ्याचे पेमेंट शासनाकडून प्राप्त झालेले आहे. सात कोटी १७ लाख ९८ हजार रुपये पेमेंट प्राप्त झाले असून, ते संबंधित शेतकऱ्यांना बुधवारपासून दिले जाणार आहे.
या केंद्रावरून हरभरा खरेदी सुरू...लातूरसह सेलू, मुरुड अकोला, उदगीर, लोणी, औसा, चाकूर, रेणापूर, देवणी, अहमदपूर, शिरुर ताजबंद, सताळा, निलंगा-हालसी, शिरुर अनंतपाळ, जळकोट या केंद्रावर हरभरा खरेदी झाला असून, आणखीन सुरू आहे. आतापर्यंत ५१ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.
नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर गेल्या पंधरा दिवसांमध्ये ५१ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून, २७ कोटी २३ लाख १८२ रुपयांपैकी ७ कोटी १७ लाख रुपये पेमेंट प्राप्त झालेले आहे. त्याचे संबंधित शेतकऱ्यांना उद्या पेमेंट केले जाणार आहे.- विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी