लातूर : उदगीर तालुक्यातील सताळा शिवारात एका फार्म हाऊसवर शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने २ टन चंदनासह ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा चाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम यांना गुप्त माहिती मिळाली की, येरोळ मोडवरुन कबनसांगवी मार्गे एका कारमधून चंदन वृक्षाची लाकुड चोरी करुन विक्री करण्यासाठी घेवुन जात आहे. त्यांनी तात्काळ चाकूरचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण मोहिते यांचे पथक तयार करून रवाना केले. या पथकाने सकाळभ ८.३० वाजण्याच्या सुमारास सापळा लावला असता कबनसांगवीजवळ एमएच १२ जेसी ३९३५ ही कार येत असल्याची दिसली. पथकाने सदर गाडीस थांबवण्याचा इशारा केला असता ती गाडी न थांबवता पुढे निघून गेली. थोड्या अंतरावर गाडी थांबवून पोलिसांनी झडती घेतली असता ११ बॅग चंदन आढळून आले.
यावेळी कारमधील इसम साईनाथ अश्रुबा पुट्टे (रा.सताळा, ता.उदगीर) यास विचारपूस केल्यावर त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेला माल आपल्या सताळा शिवारातील आखाड्यावर ठेवत असल्याचे सांगितले. त्यावरून पथक शेतात पोहचले असता आखाड्यावरील शेडच्या बाजूस एका ट्रकमध्ये दोघेजण चंदनाच्या धपल्या, लाकडे भरत असल्याचे आढळून आले. तसेच शेडच्या बाजूस असलेल्या उकंड्याच्या हौदात उतरून पाहणी केली असता त्यात चंदनाचे लाकडे व धपल्या असलेल्या बॅगा आढळून आल्या. या कारवाईत जवळपास २ टन चंदन अंदाजे किंमत ४० लाख आणि इतर असे एकुण ६२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
तीन जणांवर गुन्हा दाखल...चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार पाराजी गंगाधर पुठ्ठेवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून साईनाथ अश्रुबा पुट्टे (रा.सताळा),लतीफ अहमद कुट्टी (रा.केरळ), गिरीषकुमार वेल्लुतिरी (केरळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनाचा मुद्देमाल कुठे वाहतूक केला जातो, याबाबतचा तपास करण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, पोलीस अमलदार साहेबराव हाके, सूर्यकांत कलम, पिराजी पुट्टेवाड, बाळू अरदवाड, रायभोले आणि रितेश अंधोरिकर यांनी कारवाई केली.