- अशपाक पठाण/बाबूराव चव्हाण लातूर/उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील रबी पेरणीचा खोळंबा झाला असून, आतापर्यंत लातूरमध्ये २०.३२, तर उस्मानाबादेत १४.२८ टक्के पेरणी झाली आहे़
कृषी विभागाच्या दप्तरी लातूर जिल्ह्यात रबी पेरणीचे एकुण क्षेत्र जवळपास २ लाख हेक्टर आहे़ १५ नोव्हेंबरपर्यंत ३९ हजार ६६१ क्षेत्रावर पेरणी झाली आहे़ औसा तालुक्यात सर्वाधिक पेरणी असून सर्वात कमी जळकोट तालुक्यात केवळ ३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकरी जमिनीचा वापसा होण्याची वाट पाहात आहेत़ काही ठिकाणी पावसाने अडथळा आणल्याने अजूनही खरिपाची पिके निघाली नाहीत़ पुढील आठवड्यात जास्त पेरण्या होतील, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली.
उस्मानाबाद जिल्ह्यात कृषी विभागाने रबी पेरणीसाठी जिल्ह्यात सुमारे ३ लाख ३१ हजार ४०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. यामध्ये उस्मानाबाद ७८ हजार ३०० हेक्टर, तुळजापूर ५० हजार ८०० हेक्टर, परंडा ५४ हजार १००, भूम ३१ हजार ३००, कळंब ४५ हजार, उमरगा ३६ हजार १००, वाशी १० हजार १०० तर लोहारा तालुक्यातील २५ हजार १०० हेक्टर इतके क्षेत्र प्रस्तावित आहे़
यापैकी आजघडीला अवघ्या ४१ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. तिही केवळ परंडा आणि वाशी तालुक्यात. या दोन्ही तालुक्यात मिळून ४० हजार हेक्टर्सपेक्षा अधिक पेरणी झाली आहे.
यंदा उतारा कमी होण्याची भीतीउर्वरित उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, कळंब, उमरगा आणि लोहारा या तालुक्यांत अद्याप रबीची पेरणी झालेली नाही, असे कृषी विभागाने शासनाला सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद केले आहे. पेरणीस उशीर होत गेल्यास रबी पिकांचा उतारा कमी होईल, अशी भीती आता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़