लातूर : सोलापूर येथील बुधवारची सभा आटोपून काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरने लातूरच्या विमानतळावर सायंकाळी ६.५० वाजता पोहोचले. परंतु, येथील विमानतळावरून रात्रीच्या वेळी विमान उड्डाणाची सुविधा नसल्याने त्यांचा लातुरात अचानक मुक्काम झाला. नियोजित दौऱ्यानुसार दुपारी ३ वाजता लातूर विमानतळावर पोहोचण्याची वेळ निर्धारित होती. परंतु, त्यांचे विमान दुपारी ४.३० वाजता पोहोचले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने सोलापूरकडे सभेसाठी रवाना झाले. सोलापूरलाही विमानतळाचे काम सुरू असल्याने त्यांचा दौरा लातूरमार्गे ठरला होता.
वैमानिक म्हणाले जोखीम नको...नियोजित वेळेपेक्षा उशिराने त्यांचा परतीचा प्रवास सोलापूरमधून हेलिकॉप्टरने सुरू झाला. सायंकाळी उशिरा ते लातूरला पोहोचले. ठरल्याप्रमाणे ते विमानाने दिल्लीला जाणार हे निश्चित असताना वैमानिकाने अंधार पडल्यामुळे जोखीम नको, असे स्पष्ट सांगितले. परिणामी, लातुरात अचानक मुक्काम घडला.
हॉटेलवर भोजन, विश्रांती...मुक्काम ठरल्यानंतर राहुल गांधी कारने विमानतळावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये मुक्कामाला आले. त्यांच्यासमवेत माजी मंत्री आ. अमित देशमुख होते. हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी भोजन घेऊन विश्रांती केली. दरम्यान, ते गुरुवारी सकाळी लवकर दिल्लीकडे रवाना होतील, असे सूत्रांनी सांगितले.