लातूर : अवैध दारुप्रकरणी लातूर येथील धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारला. यावेळी बारा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना न्यायालयात दाखल केले असता, न्यायालयाने प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठाेठावला आहे. तर यापूर्वीच्या कारवाईत हाॅटेल-धाबा मालकांना प्रत्येकी २५ हजार आणि मद्यपींना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक केशव राउत यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या पथकाला खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे लातुरातील औसा राेडवर असलेल्या हाॅटेल रायगड धाब्यावर उदगीर आणि लातूर येथील पथकाने संयुक्त छापा मारला. यावेळी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले. हाॅटेलचालकाविराेधात कलम ६८ आणि ८४ अन्वये अवैध दारुप्रकरणी कारवाई करण्यात आली. दरम्यान, पथाकने सहा हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेल्या बारा जणांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने प्रत्येकी ५०० रुपयांचा असा एकूण ६ हजारांचा दंड ठाेठावला आहे.
ही कारवाई निरीक्षक आर.एम. बांगर, निरीक्षक आर.एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल.बी. माटेकर, ए.के. शिंदे, स्वप्नील काळे, अ.ब. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक ए.एल. कारभारी, गणेश गाेले, जवान अनिरुद्ध देशपांडे, हणमंत मुंडे, संताेष केंद्र, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार यांच्या पथकाने केली.