लातूर : औसा तालुक्यातील भुसणी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लातूर येथील पथकाने छापा मारुन, बनावट देशी दारु आणि त्याच्या निर्मितीसाठी लागणारे स्पिरिट असा एकूण ५१ लाख ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी दाेघांना अटक करण्यात आली आहे.
लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिजित देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली. त्यांनी याबाबत आपल्या भरारी पथकाला कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, उस्मानाबाद आणि लातूर येथील पथकाने औसा तालुक्यातील भुसणी शिवारात असलेल्या एका वेअर हाऊसवर बुधवारी पहाटेच्या सुमारास धाड मारली. यावेळी अवैधरित्या विनापरवाना बनावट देशी दारुची निर्मिती आणि त्यासाठी लागणारे स्पिरिटची (मद्यसार) वाहतूक आणि विक्री करण्याच्या उद्येशाने बाळगल्याचे आढळून आले.
या धाडीत प्लास्टिकच्या टाक्या, चारचाकी वाहन, कंटनेर, ट्रक, माेबाईल असा एकूण ५१ लाख ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी रविकुमार शिवपूजन गुप्ता (वय २७, रा. कानपूर, उत्तरप्रदेश) आणि ज्ञानेश्वर बाबुसिंग राजपूत (वय ४५ रा. दहिंदुले, ता. पातोंडा, जि. नंदूरबार) यांना अटक करण्यात आली आहे.