लातूर- चाकूरसह हंडरगुळी येथील विविध ठिकाणी पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत छापेमारी केली. यात ५ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत गुटखा विक्री करणाऱ्याविरोधात कारवाई सुरु होती. चाकूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत कदम, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी सांगितले, चाकूर शहरात गुटख्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या घरावर पोलिसांनी छापा मारला. यात हाती लागलेला गुटखा उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथून पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस पथकाने हंडरगुळी येथेही छापा मारला. एकूण सात ठिकाणावर मारलेल्या छाप्यात ५ लाख ८० हजार ७५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत, प्रल्हाद माने यांच्याकडून २ हजार ९०० रुपयांचा गुटखा, हाळी हंडरगुळी येथील ओमकार मलीकार्जुन कालवणे यांच्याकडून गुटखा, पानमसाला असा ३०३५० रुपयांचा मुद्देमाल, रोशन वजीरसाव तांबोळी (रा. हाळी) याच्याकडून ३७५०२५ रुपयांचा गुटखा, पान मसाला जप्त केला आहे. सुनील माचेवाड (रा. हंडरगुळी ता. उदगीर) याच्याकडून ३४८०० रुपयांचा गुटखा, पानमसाला, विष्णू हमदळे (रा. हंडरगुळी) याच्याकडून ७५६०० रूपयांचा गुटखा, पानमसाला, रामदास चिंतलवार (रा. हंडरगुळी) यांच्याकडून ६५४०० रुपयांचा गुटखा, पानमसाला असा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, गुटख्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे चाकूर येथील सहाय्यक पाेलीस अधीक्षक अनिकेत कदम यांनी सांगितले.