लातूर : जिल्ह्यातील काेराळवाडीत हातभट्टी अड्ड्यावर कासार शिरसी पाेलिसांनी मंगळवारी छापा मारला असून, हातभट्टी दारू, निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा जवळपास ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत कासार शिरसी पाेलिस ठाण्यात दाेन गुन्हे दाखल केले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री, वाहतूक आणि हातभट्टी अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. त्यानुसार कासारशिरशी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रेवनाथ डमाळे यांच्या पथकाने निलंगा तालुक्यातील कोराळवाडी येथील हातभट्टी अड्ड्यावर मंगळवारी छापा मारला. यामध्ये ९१५ लिटर रसायन, साहित्य, हातभट्टीची दारू, रसायन, निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा जवळपास ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत उमाकांत ऊर्फ दगडू रोहिदास यंपाळे (वय ३५, रा. कोराळवाडी, ता. निलंगा), अजय अंबादास रेवणे (वय २०, रा. कोराळवाडी, ता. निलंगा) यांच्याविराेधात कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर, श्रीकांत वरवटे, मनोज चव्हाण, अमोल नागमोडे यांनी केली.