लातूर : जिल्ह्यातील वसंतनगर तांडा येथे सुरू असलेल्या हातभट्टी निर्मिती अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लातूर आणि उदगीर येथील पथकाने शुक्रवारी संयुक्तपणे छापा मारला. यावेळी दाेघांना अटक करण्यात आली असून, हातभट्टी दारू, निर्मिती करण्यासाठी लागणारे रसायन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री केली जाते. अशा अवैध दारू, हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी आपल्या पथकांना दिले हाेते. दरम्यान, हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या अड्ड्याची माहिती पथकाला मिळाली. याबाबत तातडीने लातूर आणि उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने माहितीची खातरजमा केली. त्यानंतर अचानक शुक्रवारी वसंतनगर येथील हातभट्टी निर्मिती सुरू असताना छापा मारला. यावेळी दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ११० लिटर हातभट्टी दारु, ती तयार करण्यासाठी लागणारे २ हजार २०० लिटर रसायन असा एकूण ६८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दाेघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लातूर विभागाचे निरीक्षक आर.एम. बांगर, उदगीरचे निरीक्षक आर.एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल.बी. माटेकर, दुय्यम निरीक्षक ए.के. शिंदे, दुय्यम निरीक्षक स्वप्नील काळे, दुय्यम निरीक्षक ए. बी. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, अनंत कारभारी, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, संताेष केंद्रे, एकनाथ फडणीस, पुंडलिक खडके यांच्या पथकाने केली आहे.