लातूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टीनिर्मिती केंद्रावर, देशी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सलग तीन दिवस धाडी टाकल्या. यावेळी विदेशी दारू १ हजार ४२५ लिटर, देशी दारू नऊ हजार लिटर आणि वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एकूण दहा गुन्ह्यांची नाेंद करण्यात आली असून, ३१ जणांना अटक केली आहे.
लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू, हातभट्टीनिर्मिती आणि विक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे लातूर आणि उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ३ ते ५ ऑगस्ट या काळात लातूर जिल्ह्यात संयुक्त कारवाई केली. यामध्ये जिल्हाभरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री अड्ड्यांवर, हातभट्टीनिर्मिती अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या. त्याचबरोबर अवैध दारूविक्री करणाऱ्या ढाब्यावरही छापा मारण्यात आला आहे. यामध्ये अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपींविरोधात एकूण दहा गुन्ह्यांची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे. यातील एकूण ३१ जणांना पथकाने अटक केली आहे. सलग तीन दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणांवर टाकण्यात आलेल्या धाडसत्रात विदेशी एक हजार ४२५ लिटर दारू, देशी नऊ हजार दारू आणि दुचाकी वाहन असा एकूण ६७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एस. कोतवाल, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, ए. के. शिंदे, स्वप्निल काळे, ए. बी. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, अनंत कारभारी, नीलेश गुणाले, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्योतीराम पवार, एस.जी. बागेलवाड, संतोष केंद्रे, एकनाथ फडणीस, पुंडलिक खडके, विक्रम परळीकर यांच्या पथकाने केली आहे.
दोन टप्प्यात झाली पथकांची कारवाई...लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अवैध दारूविक्री, हातभट्टीनिर्मिती अड्ड्यावर आणि चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने दोन टप्प्यामध्ये कारवाई करण्यात आली. यामध्ये पहिला टप्प्यात हा १ ते ३ ऑगस्ट आणि दुसरा टप्पा हा ३ ते ५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात आला. पहिल्या टप्प्यात ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.