किनगाव (जि. लातूर) : अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथील मन्याड नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत असल्याने महसूल व पोलिसांनी धाड टाकली. यात पोकलेन, ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळू असा एकूण ६२ लाख २ हजार ५१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदपूर तालुक्यातील विळेगावनजीकच्या मन्याड नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन शनिवारी तहसील कार्यालय व किनगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने धाड टाकली. यावेळी काहीजण नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करीत असल्याचे दिसून आले. या पथकास पाहताच वाळू उपसा करणारे पसार झाले.दरम्यान, वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येत असलेले दोन पोकलेन मशीन, वाळू चाळण्याची चाळणी, ट्रॅक्टर ट्रॉली आणि ३१ ब्रास वाळू असा एकूण ६२ लाख २ हजार ५१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे साहित्य पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी तलाठी निळकंठ कराड यांच्या तक्रारीवरून किनगाव पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश बंकवाड, पोउपनि आर.एस. जाधव, पोलीस अंमलदार व्यंकट महाके, डोईजड, कातळे, कोतवाड, कोळी तसेच नायब तहसीलदार मोरे, मंडळाधिकारी क्षीरसागर, तलाठी कराड यांच्या पथकाने केली.