लातूर : औसा येथील सावली लॉजवर दामिनी आणि एएचटीयू पथकाने शनिवारी छापाला मारला. यावेळी एका पीडित महिलेची सुटका केली असून, दाेघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, औसा शहरात लॉज आणि हॉटेलच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचा प्रकार समाेर आला. तुळजापूर टी-पाॅईंट निलंगा रोड येथे सावली लॉजवर हा प्रकार सुरु असून, मालक आणि व्यवस्थापकाने काही महिलांना लॉजवर आणून वेश्याव्यवसायासाठी एजंटामार्फत ग्राहक आणून वेश्या व्यवसाय चालवीत आहेत, अशी माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. याबाबत जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुकसार खबऱ्याने दिलेल्या माहितीची पडताळणी करून पाेलिसांनी बनावट ग्राहक लॉजवर पाठविला. बनावट ग्राहकाकडून इशारा मिळतात पाेलिस पथकाने सावली लॉजवर छापा टाकला. यावेळी वेश्याव्यवसायासाठी बाहेर गावाहून आणलेली एक पीडित महिला आढळून आली. पाेलिसांनी लॉजच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेची पाेलिसांनी सुटका केली आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात लाॅजमालकासह अन्य एकाविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अप्पर पाेलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक, एएचटीयू पथकाचे सपोनि. दयानंद पाटील, पोउपनि. सुभाष सूर्यवंशी, सदानंद योगी, प्रकाश जाधव, लता गिरी, मीना पवार, मीरा सोळंके, सुजाता चिखलीकर यांच्या पथकाने केली आहे.