लातूर : नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी छापा मारून अटक केली आहे. त्यांच्याकडून नशेच्या गोळ्यासह १ लाख ३५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत तिघा मेडिकल चालकावर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकला खबऱ्याने माहिती दिली. काही व्यक्ती विनापरवाना डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रिस्क्रिप्शनशिवाय, चोरट्या मार्गाने नशेच्या गोळ्यांची विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यासह लातूर शहरात विविध ठिकाणी छापा मारला. मेडिकल दुकानांची झाडाझडती घेतली असता नशेचा गोळ्यांचा साठा आढळून आला. यावेळी गोळ्यांची विक्री करणाऱ्या महेश धोंडीराम घुगे ( वय ३७, रा. हेर कुमठा ता. उदगीर ह.मु. महाडा कॉलनी, हरंगुळ ता. लातूर), बालाजी सुरेश मदने (वय ३८, रा. बोरी, ता. उमरगा, जि. धाराशिव ह. मु. मजगे नगर, लातूर) आणि रुपीन जयंतीलाल शहा (वय ६३, रा. मंठाळे नगर, लातूर) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, संपत फड, नाना भोंग, राजेश कंचे, राजेभाऊ मस्के, तुराब पठाण तसेच अन्न व औषध विभागचे औषध निरीक्षक अंजली मिटकर यांच्या विशेष पथकाने केली.