लातूर :
झोपेच्या गोळ्यासह गुंगीकारक औषधाच्या विक्रीप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि लातूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक यांच्या संयुक्त पथकाने लातुरातील काही संशयीत मेडिकल दुकानावर गुरुवारी धाडी टाकल्या. याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले, लातुरातील झोपेच्या गोळ्याची सर्रासपणे विक्री होत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, चाकूर तालुक्यातील एका तरुणाला ३५० गोळ्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर झालेल्या चौकशीत काही मेडिकल दुकानदाराबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, सुतमील रोड आणि अंबाजोगाई रोड परिसरातील काही संशीयीत मेडिकल दुकानावर धाडी टाकल्या आहेत. दरम्यान, दुकानातील रेकॉर्डची पथकाकडून तपासणी केली जात आहे. उपलब्ध साठा आणि विक्री याचीही तपासणी सध्याला केली जात आहे.
याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दयानंद पाटील यांनी दिली.
कर्नाटकातून येणाऱ्या गोळ्यावर पोलिसांची नजर...लातूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी झोपेच्या आणि नशेच्या गोळ्याची विक्री चोरट्या मार्गाने होत आहे. या गोळ्या शेजारच्या कर्नाटक राज्यातून येत असल्याची माहिती समोर आली आहे. याविरोधात कारवाईची मोहीम सुरुच राहणार आहे. - निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर