लातूर : शहरालगत असलेल्या आर्वी येथे एका झाडाखाली सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी छापा मारला. यावेळी चारजण जाळ्यात अडकले तर चारजण पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, पाेलिसांनी ४ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरालगत असलेल्या साई राेड, आर्वी येथे एका लिंबाच्या झाडाखाली तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. याबाबत माहितीच्या आधारे पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, मनोज खोसे, नानासाहेब भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर,रवी गोंदकर, राहुल कांबळे यांच्या पथकाने तातडीने रविवारी छापा मारला.
यावेळी लिंबाच्या झाडाखाली आठ जण गाेलाकारात तिर्रट नावाचा जुगार स्वत:च्या फायद्यासाठी, पैशावर खेळत असल्याचे आढळून आले. यातील चार जणांना पकडण्यात पाेलिसांना यश आले असून, चार पाेलिसांच्या तावडीतून निसटले आहेत. यावेळी जुगाराचे साहित्य, माेबाईल, राेख रक्कम, दुचाकीसह एकूण ५ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या चार जुगाऱ्यांना एमआयडीसी पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन कलम १२ (अ) मुंबई जुगार कायद्यानुसार आठ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.