लातूर : जिल्ह्यातील उदगीर, वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेला हातभट्टी अड्ड्यावर पाेलिस पथकाने छापा मारला. यावेळी १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत त्या-त्या पाेलिस ठाण्यात स्वतंत्र चार गुन्हे दाखल केले आहेत.
सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, हातभट्टी दारू तयार करून चाेरट्या मार्गाने विक्री करणाऱ्यावर कारवाईचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस पथकाने उदगीर, वाढवणा ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी अड्ड्यावर रविवारी सकाळी छापा मारला. यावेळी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे १ हजार ७५९ लीटर रसायन, साहित्य, हातभट्टी दारू असा १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संतोष रतन पवार, चंद्रकांत ठाकूर राठोड, दिलीप देवराव पवार, लक्ष्मण भीमराव पवार (सर्व रा. उदगीर) यांच्या विराेधात उदगीर, वाढवणा ठाण्यात गुन्हा नाेंद केला आहे.
ही कारवाई स्थागुशाचे सपोनि. प्रवीण राठोड, राहुल सोनकांबळे, कोळसुरे, प्रकाश भोसले, सिद्धेश्वर जाधव, नितीन कटारे, मनोज खोसे, राहुल कांबळे, नकुल पाटील, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली आहे.