राजकुमार जाेंधळे / लातूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अवैध दारु, हातभट्टी अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एसएसटी आणि एफएसटी पथकांनी मंगळवारी एकाचवेळी धाडी टाकल्या. यावेळी हातभट्टी दारु, रसायन, देशी दारुचा साठा असा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी सहा जणांना अटक केली असून, त्यांच्याविराेधात गुन्हे दाखल केले आहेत.
लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील विविध भागात अवैध दारु निर्मिती, विक्री, वाहतुकीविराेधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई माेहीम हाती घेण्यात आली आहे. उदगीर ग्रामीण आणि वाढवणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी अड्ड्यावर दारु निर्मिती, साठा केल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे एसएसटी, एफएसटी पथकांनी मंगळवारी सकाळी उदगीर तालुक्यातील हाकनाकवाडी, डाेंगरशेळकी तांडा आणि उदगीर ग्रामीण भागातील इतर दारु अड्ड्यावर एकाच वेळी धाडी टाकल्या. यावेळी १५० लिटर हातभट्टी, हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे २ हजार लिटर रसायन, ९ लिटर देशी दारु असा १ लाख ८ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे उपायुक्त बी.एच. तडवी यांच्या आदेशानुसार लातूरचे अधीक्षक केशव राउत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर येथील निरीक्षक आर.एम. चाटे, दुय्यम निरीक्षक राेटे, ए.एस. घुगे, एन.डी. कचरे, एस.पी. मळगे, एम.जी. पाटील, आर.जी. सलगर, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, एन.टी. गुणाले, जवान जे.आर. पवार, ए.ए. देशपांडे, उदगीर ग्रामीण ठाण्याचे पाेलिस निरीक्षक अरविंद पवार, आर.के. मुंडे, एस.सी. बनसाेडे, संताेष शिंदे, नामदेव चेवले, एन.एन. कुलकर्णी, वाढवणा ठाण्याचे पाेउपनि. मुरारी गायकवाड, एफएसटी पथकाचे प्रमुख अविनाश मारमवार, अभिषेक बिरादार यांच्या पथकाने केली.