अहमदपूर (जि. लातूर) : शेतात सुरू असलेल्या जुगारावर विशेष पाेलिस पथकाने छापा मारल्याची घटना मंगळवारी अहमदपूर तालुक्यातील शेणी शिवारात घडली. यावेळी ९ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ४ लाख १७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात बुधवारी सुमारास ११ जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायाविराेधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, चाकूर आणि अहमदपूर उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पाेलिस पथकाने अवैध व्यवसायाची माहिती मिळविली. अहमदपूर तालुक्यातील शेणी शिवारात सुरू असलेल्या जुगाराची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली.
या माहितीची खातरजमा करून, पाेलिस पथकाने मंगळवार, १४ मार्च राेजी शेणी शिवारात छापा मारला. यावेळी काही व्यक्ती पैशावर तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी पाेलिसांनी नऊ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा ४ लाख १७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात बुधवारी सुमारास एकूण ११ जणांविराेधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांच्या हातून दाेघे जुगारी निसटले..
शेतात सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर पाेलिस पथकाने छापा मारला असता, नऊजणांना अटक करण्यात पथकाला यश आले आहे. मात्र, यातील दाेन जुगारी पाेलिसांच्या हातून निसटले आहेत. त्यांचा पाेलिस शाेध घेत आहेत. अहमदपूर तालुक्यात सुरू असलेल्या गुटखा, मटका आणि जुगार यापूर्वीही धडक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, हे व्यवसाय काही थांबत नसल्याची चित्र दिसून येत आहे.