- राजकुमार जोंधळे लातूर : गुरुवारी दुपारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी धुमाकूळ घातला आहे. परिणामी, शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहे. तर निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील औराद - तगरखेडा, औराद - वांजरखेडा, सावरी - जामगा आणि औराद ते मानेजवळगा या मार्गावरील पूल पावसाच्या पाण्याने वाहून गेले आहेत. दरम्यान, या गावांचा गेल्या चार दिवसापासून संपर्क तुटला आहे. या मार्गावरील वाहतूक सध्याला ठप्प झाली आहे. लातूरसह जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. दिवस-रात्र थांबून-थांबून पाऊस पडत आहे. काही भागात शनिवार आणि रविवारी सकाळपासूच पावसाने हजेरी लावली. परिणामी, ग्रामीण भागातील नदी, नाले आणि नद्यांना पूर आला आहे. नदी-नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने ठिकठिकाणच्या पुलावरुन पावसाचे पाणी वाहत आहे. तर नदी, नाले काठावर असलेल्या शेतात पाणी शिरले असून, पिके पाण्यात आहेत. सध्याला लातूर जिल्ह्यातील बहुतांश गावातील खरिपाच्या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पावसाने महामार्गाचे नुकसान...गेल्या दोन आठवड्यापासून पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील बहुतांश रस्त्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, बिदर ते नांदेड महामार्गावरील उदगीर-अहमदपूर दरम्यानच्या मार्गाची मोठी हानी झाली आहे. या मार्गावरून वाहन चालविणे अवघड बनले आहे.
वीजेच्या धक्क्याने म्हशी दगावल्या..पाऊस सुरू असताना विजेच्या तारा तुटून बसलेल्या वीजेच्या धक्क्याने दोन म्हशी दगवल्याची घटना निलंगा तालुक्यातील सिंदखेड येथे घडली. तर धानोरा येथे भिंत कोसळल्याने दोन मेंढ्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील रामराव मुकदम पाटील यांच्या घराची भिंत कोसळली आहे.