लातूर : शहरासह जिल्ह्यातील काही भागामध्ये रविवारी रात्री १०:१५ वाजण्याच्या सुमारास बेमाेसमी पावसाच्या सरी काेसळल्या. गत आठ दिवसांपासून लातूर शहरासह जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंशांवर पाेहोचला हाेता. दरम्यान, सकाळी १० ते सायंकळी ५ वाजेपर्यंत उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दिवसभर वाढत्या तापमानामुळे वातावरणात उकाडा हाेता. परिणामी, नागरिक माेठ्या प्रमाणावर हैराण आहेत. रविवारी रात्री झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला.
लातूर शहरासह जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर ओलांडला हाेता. दरम्यान, काही दिवस ४०, तर काही दिवस ४१ अंशांवर उन्हाचा पारा गेल्याने अंगाची लाहीलाही हाेत हाेती. रविवारी सकाळपासूनच उन्हाचा चटका असह्य हाेत हाेता. परिणामी, लातुरातील प्रमुख रस्त्यांवर अघाेषित संचारबंदी असल्याचे चित्र दिसून येत हाेते. सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल हाेण्यास सुरुवात झाली. ढगाळ वातावरण आणि जिल्ह्यातील काही भागात वारे, विजांचा कडकडाट झाला. रविवारी रात्री १०:१५ ते ११ वाजण्याच्या सुमारास लातूर, रेणापूर आणि जिल्ह्यांतील इतर तालुक्यांच्या भागात बेमाेसमी पावसाने हजेरी लावली.
वातावरण बदलले; नागरिकांना दिलासा...
गत आठ दिवसांपासून दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांसह पशुधन हैराण झाले हाेते. दिवसभर घराबाहेर पडणेही मुश्किल झाले हाेते. शेतकऱ्यांनी सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहेत. रविवारच्या पावसाने वातावरण बदलल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
रानात पशू-पक्ष्यांची पाण्यासाठी हाेरपळ...
मे महिन्यात तापमानाचा पारा ४१ अंशांवर पाेहोचल्याने रानावनातील पाणवठही आटायला लागले आहेत. काही विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. पाण्यासाठी पशूधनासह पशू-पक्ष्यांची शेतशिवारात, रानावनात हाेरपळ हाेत आहे. पाण्यासाठी काही गावात ग्रामस्थांची भटकंती सुरू आहे.