जिल्ह्यातील देवर्जन, साकोळ, रेणा, घरणी, मसलगा, व्हटी, तिथून ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तावरजा प्रकल्प अद्याप भरलेला नाही. मध्यम प्रकल्पामध्ये १२२.१५६ दलघमी पाणीसाठा झाला असून त्यातील उपयुक्त पाण्याची क्षमता ९८.०५८ दलघमी आहे. तर लघु प्रकल्पामध्ये ३०५.९३४ दलघमी पाणीसाठा झाला आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा २१७.९३० दलघमी आहे. मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून २४२ प्रकल्पांमध्ये ६९५.५३३दलघमी प्रकल्पीय पाणीसाठा आहे. त्यापैकी प्रत्यक्षात उपयुक्त पाणीसाठा ५७१.४२८ दलघमी झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी पाण्याचा साठा मुबलक झाला आहे. त्यामुळे रब्बी पिकाच्या सिंचनाचा प्रश्न सुटलेला आहे. सोयाबीन काढणीला आले आहे; परंतु शिवारामध्ये पाणी असल्यामुळे काढणी करता येत नाही. शिवाय, सोयाबीनचे भाव उतरले आहेत. त्यामुळे यंदा सोयाबीन पाण्यात गेल्याचे शेतकरी सांगत आहेत.
मांजरा नदीवरील सर्व बॅरेजेस ओवरफ्लो....
मांजरा नदीवरील केज तालुक्यातील धनेगाव येथील मोठ्या धरणापासून सर्व बॅरेजेस भरले आहेत ना सर्व कानडी बोरगाव, टाकळगाव, वांजरखेडा, साई, नागझरी व त्याखाली असलेले सर्व बॅरेजेस भरले आहेत. मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून मोठा विसर्ग करण्यात आला आहे. या धरणाचे दरवाजे २ मीटरने वर करण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदीवरील बॅरेजेसमधून हे पाणी सोडण्यात आले आहे.
मसलगा पाणलोट क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा....
निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्प १०० भरण्याच्या मार्गावर आहे. सध्या धरणात ८७.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरण निर्धारित पातळीत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर धरणात येणारा यावा तेरणा नदी मार्गे सोडावा लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाअंतर्गत असलेल्या सोहळा गावांना तसेच नदीकाठी वस्ती करून असलेल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
आठपैकी सात मध्यम प्रकल्प भरले....
लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी देवर्जन, साकोळ, रेणा, व्हटी, घरणी, मसलगा आणि तिरू हे सात मध्यम प्रकल्प भरले आहेत. तावरजा प्रकल्प भरण्यासाठी आणखीन वेळ आहे.