चाकूर येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकाऱ्यांचा पदाचा कारभार गत पावणेतीन वर्षांपासून प्रभारींवरच हाकला जात आहे. तालुक्यात जवळपास ७४१ शिक्षक, २९ हजार ८६४ विद्यार्थी संख्या आहे. शिक्षण विभागाचे प्रमुख गटशिक्षणाधिकारी पद गेल्या काही वर्षांपासून रिक्तच आहे. परिणामी, शिक्षणाचा खोळंबा झाला आहे. शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी म्हणून संजय पंचगल्ले १ जुलै २०१५ राेजी रुजू झाले होते. त्याची लातूर येथे बदली झाल्याने १९ जुलै २०१८ रोजी ते लातूरला गेले. त्यांचा पदभार रेणापूरच्या गटशिक्षणाधिकारी वंदणा फुटाणे यांच्याकडे १९ जुलै २०१८ रोजी देण्यात आला. रेणापूर येथील गटशिक्षणाधिकारी वंदणा फुटाणे यांच्यावर चाकूरचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. शिक्षण विभागाची कामे करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. आता वंदणा फुटाणे यांची लातूर येथे ७ सप्टेंबर २०२० रोजी बदली झाली आहे. आता त्यांचा पदभार कोणातरी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपविणे क्रमप्राप्त होते. मात्र, विस्तार अधिकारी संजय आलमले यांच्याकडे शिक्षण विभागाचा गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार ८ सप्टेंबर २०२० ला सोपविण्यात आला. चाकूर तालुक्यात प्राथमिक शिक्षणाचे जाळे मोठे आहे. शिक्षण विभागाला पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध नसल्याने गत दाेन वर्ष आठ महिन्यांपासून प्रभारींवर कारभार सुरू आहे. चाकूर येथे कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी देण्यासाठी प्रशासनात उदासीनता आहे. ५ सप्टेंबरला दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार गेल्या तीन वर्षांपासून रखडला हाेता. शिवाय, शिक्षण विभागातील अनेक कामे रेंगाळली आहेत. संजय आलमले यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी देऊन त्यांच्या कामावर अतिरिक्त भार दिला गेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी पदावर पूर्ण अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी पालकांसह शिक्षणप्रेमी नागरिकांतून होत आहे. सन २०१९ मधील ३४, सन २०२० मधील १८ आणि सन २०२१ मधील २६ असे ७८ आदर्श शिक्षकांचा सत्कार वितरण सोहळा गुरुवार, ४ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आला आहे.
चाकुरातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागात ‘प्रभारी’राज ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 6:21 AM