मुरुड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले असून, शुक्रवारी उपोषणाचा सातवा दिवस होता. उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली असून, शासनाने तत्काळ प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी लातूर-बार्शी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास दोन तास चाललेल्या रस्ता रोकोमुळे पाच किलोमीटर चक्काजाम झाले होते. यावेळी मराठा बांधवांच्या वतीने शासनाचा निषेध करण्यात आला. लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक आलेराव व तलाठी पानगावकर यांना निवेदन देण्यात आले.