रेणापूर : तालुक्यातील सकल धनगर समाजबांधवांच्या वतीने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामावून घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, खिल्लारे कुटुंबीयांचे जात प्रमाणपत्र रद्द करावे यासाठी गुरुवारी सकाळी १० वाजता लातूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर महापूर पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तीन तास चाललेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आंदोलनात धनगर समाज आरक्षणाची एसटी प्रवर्गात तत्काळ अंमलबजावणी करावी, खिल्लारे कुटुंबीयांचे प्रमाणपत्र रद्द करावे या प्रमुख मागण्यांसाठी रेणापूर तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन तीन तास चालले. या आंदोलनाच्यावेळी धनगर समाजबांधवांच्या वतीने मनोगत व्यक्त करून शासनाविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला.
सकाळी दहापासून दुपारी १ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. रेणापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी फाटा येथे बॅरिकेट लावून वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून अंबाजोगाईकडून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाने जाण्यासाठी सूचना केल्या जात होत्या. काही काळ रेणापूर पिंपळफाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. आंदोलन सुरू झाल्यापासूनच रेणापूर तहसीलचे नायब तहसीलदार सुभाष कानडे, पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आंदोलनस्थळी हजर होते.