रेणापूर तालुक्यातील हणमंतवाडी तांड्यास गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे तांड्यावरील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तांड्यास पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी वारंवार नगरपंचायतीच्या मुख्याधिका-यांकडे मागणी करण्यात येऊन पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, अद्यापही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सातत्याने निवेदन देऊनही पाण्याचा प्रश्न सुटत नाही. घागरभर पाण्यासाठी शेतक-यांच्या शेतात जावे लागत आहे. त्यामुळे दिवसभराची कामे बाजूला ठेऊन अबालवृध्दांना पाण्यासाठी फिरावे लागत आहे.
पाण्याची समस्या सोडविण्यात यावी म्हणून गोर सेनेना व हणमंतवाडी तांड्यावरील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु, लोकप्रतिनिधींसह नगरपंचायत प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी सकाळी ११ वा. हणमंतवाडी तांड्यावरील महिला, मुले, नागरिक व गोरसेनेच्या वतीने रेणापूर- पानगाव- खरोळा रस्त्यावरील पानगाव फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले.
मुख्याधिका-यांचे लेखी आश्वासन...
नगरपंचायत मुख्याधिका-यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थ व गोर सेनेने आपले आंदोलन मागे घेतले. रेणापूर नगरपंचायतीने आगामी काळात या परिसरात आणि तांड्यावर मुलभूत सुविधांकडे उपलब्ध न केल्यास अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात येईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष बबलू जाधव, शरद राठोड, सचिव दया नायक राठोड, रवी चव्हाण, बालाजी राठोड, बाळू चव्हाण आदी उपस्थित होते. आंदोलनाला संभाजी सेना, भीम आर्मी, प्रहार जनशक्ती पक्षाने पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला आहे.