औसा (लातूर ) : सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर-सोलापूर महामार्गावरील शिवली मोडवर मराठा आरक्षण व तालुक्यातील दोन आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला २५ लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ आंदोलनामुळे वाहनांच्या जवळपास तीन किमी रांगा लागल्या होत्या.
मराठा आरक्षणासाठी शनिवारी सकाळी औसा तालुक्यातील शिवली मोडवर आंदोलन झाले़ सेलू व तळणी येथील दोन युवकांनी मराठा आरक्षण व नापिकीमुळे आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाला २५ लाखाची आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत नोकरी देण्यात यावी. महाभरतीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देवूनच भरती करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे़ यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ दरम्यान, आंदोलनामुळे दोन तास महामार्गावरीलवाहतूक ठप्प करण्यात आली. औसा पोलिसाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
तरूणांनो जीव देवू नकामराठा आरक्षणासाठी औसा तालुक्यातील दोन युवकांनी आपला जीव दिला.यामुळे त्याचे कुटुंब तर उध्वस्त झालेच.पण समाजातील एक व्यक्ती कमी झाला. आरक्षण हा आपला हक्क असून हक्क मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने अंदोलन करु. तुमच्या पाठीशी करोडो समाजबांधव उभे आहेत. आत्महत्या करु नका, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री, आमदार, खासदार, जि.प.सदस्य, प.स.सदस्य, यासह सर्व पदाधिकारी जे सुचना देवून ही समाजाच्या लढ्यात सामील होत नाहीत. त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.