रेणापूर : मराठा आरक्षण देण्यात यावे, तसेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर-लातूर या महामार्गावरील निवाडा फाटा येथे मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे दीड तास वाहतूक ठप्प होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी व पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने निवाडा बावची फाट्यावर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रस्ता रोको आंदोलनामध्ये तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, पक्ष व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून मराठा समाजाचे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार केला. समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.