किल्लारी (लातूर ) : किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी शासनाने येत्या १५ दिवसांत निर्णय घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी आज लातूर- उमरगा मार्गावरील किल्लारी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर रास्तारोको आंदोलन कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आले़
किल्लारी साखर कारखाना हा सभासद, ऊस उत्पादक, कारखाना कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सध्या हा कारखाना अवसायकाच्या ताब्यात आहे़ कारखान्यावर साडेतीन कोटींचे कर्ज आहे़ परंतु, तो सुरु करण्यासाठी वेळेत टेंडर काढले जात नाही़ तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या या कारखान्याचे एकुण २० हजार सभासद आहेत़ पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि उमरग्याचे आ़ ज्ञानेश्वर चौगुले हे सत्ताधारी पक्षाचे आहेत़ सध्या या भागात ६ लाख एकरवर ऊसाची लागवड झाली असून हा ऊस कुठे पाठवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे़ मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी कारखाना सुरु करण्याचे जाहीर केले होते़ परंतु, अद्याप कुठलीही प्रक्रिया सुरु झाली नाही़ कारखाना सुरु करण्यासाठी आताच टेंडर काढावे लागते़ कारण जुलैमध्ये मशीनरीची दुरुस्ती करुन साधारणत: आॅक्टोबरमध्ये कारखाना सुरु होतो़
दरम्यान, कारखाना कृती समितीने मुख्यमंत्री, सहकारमंत्री, पालकमंत्र्यांची वारंवार भेट घेऊन निवेदने दिली़ परंतु, आश्वासनाशिवाय कुठलीही प्रक्रिया झाली नाही़ कारखाना सुरु करण्यासंदर्भात कुठल्याही हलचाली सुरु नाही़ येत्या हंगामात हा कारखाना सुरु करण्यात यावा, या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी गुंडाप्पा बिराजदार, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, किल्लारीचे उपसरपंच अशोक पोतदार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, सचिन पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, गुलाब शिंदे, बापूराव कुन्हाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, दिलीप लोहार, माजी पंचायत समिती सदस्य जयपाल भोसले, राजाराम इंगळे, रमेश हेळंबे, निवृत्ती भोसले, रुक्मानंद पवार आदी उपस्थित होते़ पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता़
राज्यमार्गावरील वाहतूक तासभर ठप्प़यावेळी गुंडाप्पा बिराजदार, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, किल्लारीचे उपसरपंच अशोक पोतदार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, सचिन पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी मनोगत व्यक्त केले. सभासदांनी नायब तहसीलदार शिवाजी कदम यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले़ यावेळी संपत माने, मंडळाधिकारी जी.आर. खुर्दे, तलाठी व्यंकट पवार होते. हे आंदोलन तासभर करण्यात आले़ त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ शेतकरी आत्महत्या केल्यानंतर मदत करण्यापेक्षा कारखाना सुरु करुन मदत करावी, अशी मागणी कारखाना बचाव कृती समितीने केली़ येत्या १५ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला़