महावितरणच्या उघड्या डीपीमुळे धोका
लातूर : शहरातील अनेक भागांत महावितरणच्या विद्युत डीपी उघड्यावर आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. औसा रोडवरील शासकीय औद्योगिक संस्थेजवळ डीपी उघड्या स्थितीत असून, या रस्त्यावरून नेहमीच वाहनाची वर्दळ असते. त्यामुळे याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असून, महावितरणचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोका वाढला असल्याचे चित्र आहे.
लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर : १ मेपासून १८ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. १ मेपासून सुरू होणाऱ्या मोहिमेसाठी २८ एप्रिलनंतर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील तरुण तसेच १८ वर्षांपुढील नागरिकांनी नोंदणी करावी आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची तयारी करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात निर्जंतुकीकरण मोहीम
लातूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजनाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार ग्रामीण भागात ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या मदतीने निर्जंतुकीकरण फवारणी मोहीम राबविली जात आहे. तसेच अँटी कोरोना फोर्स कार्यान्वित करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी लक्षणे दिसताच तपासणी करण्याच्या सूचना ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येत आहे. या उपक्रमाला ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत.
रस्त्यावरील बांधकाम साहित्यामुळे अडथळा
लातूर : शहरातील अनेक भागांत बांधकामांना वेग आला आहे. मात्र, बांधकामासाठी लागणारे साहित्य रस्त्याच्या मधोमध टाकले जात असल्याचे चित्र आहे. यामध्ये वाळू, खडी, लोखंडी साहित्याचा समावेश आहे. रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्यामुळे स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच चारचाकी वाहन जाण्यास रस्ता मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांविरोधात शहर महापालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
बार्शीरोडवरील दुभाजकातील झाडे बहरली
लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. या झाडांना नियमित पाणी दिले जात असून, ही झाडे फुलांनी बहरली आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता करून झाडे लावण्यात आली होती. या झाडांची नियमित देखभाल केली जात असून, सकाळच्या वेळी पाणीपुरवठा केला जात आहे. बहरलेल्या फुले रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
ग्रामीण भागात दवंडीद्वारे जनजागृती
लातूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात दवंडीद्वारे कोरोनाच्या उपाययोजना बाबत जनजागृती मोहीम राबविली जात आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करावे. आपल्याजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करून घ्यावे. कोणताही आजार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आदी सूचना दवंडीद्वारे केल्या जात आहेत. यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलीसपाटील परिश्रम घेत आहेत.
संचारबंदीमुळे घरच्या घरीच व्यायाम
लातूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे क्रीडा संकुल, व्यायामाची ठिकाणे बंद आहेत. परिणामी अनेक नागरिक घरच्या घरीच व्यायामाला पसंती देत आहेत. घराच्या टेरेसवर वॉकिंग करीत असून, योगा, प्राणायाम करीत आहेत. विविध प्रशिक्षकांच्या वतीने संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, मार्गदर्शन केले जात आहे. आहार, मानसिक स्वास्थ्य आदींबाबत माहिती दिली जात असून, ऑनलाइन प्रशिक्षण शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यापासून संरक्षण करता यावे यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. परिणामी, मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्येत घट झाल्याने सॅनिटायझरच्या मागणीत घट झाली होती. मात्र आता रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच मास्क, सॅनिटायझरच्या वापराबाबत जनजागृती करण्यात येत असल्याने मास्क, सॅनिटायझरच्या मागणीत मोठी वाढ झाली असल्याचे शहरातील मेडिकल व्यावसायिकांनी सांगितले.
शहरात गल्लोगल्ली भाजीपाला विक्री
लातूर : शहरात गल्लोगल्ली हातगाडीद्वारे भाजीपाला विक्री केली जात आहे. ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक होत असून, अनेक व्यापारी गल्लोगल्ली जाऊन प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच भाजीपाला विक्री करीत आहेत. तसेच फळेही विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात असल्याचे चित्र आहे. योग्य खबरदारी घेतली जात असून, घरपोच भाजीपाला मिळत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, भाजीपाल्याची आवक घटली असल्याने दरात वाढ झाली आहे.
बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी
लातूर : शहरानजीक असलेल्या सदाशिवनगर, गोविंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, यातील काही पथदिवे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार पसरत आहे. बंद असलेले पथदिवे सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. बंद असलेले पथदिवे तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे.