अहमदपूर : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग हा अहमदपूर शहरालगत बायपास जात असून, यासाठी जवळपास १५० शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. मावेजापोटी उपजिल्हाधिकारी यांनी खरेदीखताआधारे सरासरी २,९०२ रूपये प्रति चौरस मीटर भाव निश्चित करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. मात्र, लवादाकडे अपील करून केवळ ६७९ रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे दर निश्चित करून शेतकऱ्यांची निराशा केली आहे. या दरातील तफावतीमुळे नुकसान होणार असून, फेरविचार करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत निर्णय न झाल्यास महामार्गाचे काम बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
महामार्गाच्या कामासाठी जिल्हाधिकारी यांनी अपीलमध्ये मंजूर केलेला ६७९ प्रति चौरस मीटर दर कमी आहे. संपादित शेतकऱ्यांच्या जमिनी या प्लॉटिंग व महामार्गालगत असल्यामुळे हा दर खूपच कमी व अन्यायकारक आहे व तो आम्हाला मंजूर नाही. हा दर चुकीचे निकष लावून देण्यात आलेला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागापेक्षाही कमी दर देण्यात आलेला आहे. यासंदर्भात २५ नोव्हेंबर २०२०च्या निकालाचा फेरविचार करून मावेजा देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निकालाचा फेरविचार न केल्यास राष्ट्रीय महामार्गाचे काम संबंधित शेतकरी होऊ देणार नाहीत. वेळप्रसंगी कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या निवेदनावर प्रा. गोविंद शेळके, शामराव भगत, बालाजी बोबडे, नंदकुमार भगनुरे, नामदेव सातापुरे, दिनेश भगत, बाबुराव बिलापट्टे, माऊली बिलापट्टे, अनिल फुलारी, सादीक शेख, मुस्ताख बक्षी, सुभाष चेवले, लक्ष्मण चेवले, कैलास भगत, बाबुराव भगत, धर्मराज चावरे, मगदूम पठाण, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.