लातूर : लातूर तालुक्यातील मुरुड येथील ग्रामविकास अधिकारी एस. आय. शेख हे ग्रामपंचायतीच्या करवसुलीचा परस्पर वापर करण्याबरोबर नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी गुरुवारी त्यांना निलंबित केले आहे.
लातूर तालुक्यातील मुरुड येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस. आय. शेख हे निविदा न मागविता साहित्य खरेदी करतात. चौकशी समितीने वारंवार मागणी करूनही अभिलेखे उपलब्ध करून देत नाहीत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण नाही. ग्रामपंचायतीचा कर वसूल करून त्याचा बँकेत भरणा न करता परस्पर खर्च करतात, अशा विविध तक्रारी करण्यात येऊन त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सूरज सूर्यवंशी व मेघराज अंधारे यांनी केली होती. याच मागणीसाठी त्यांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषणही सुरू केले होते.
या तक्रारींची दखल घेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांनी गुरुवारी ग्रामविकास अधिकारी एस. आय. शेख यांना निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत त्यांनी चाकूर पंचायत समितीत राहणे बंधनकारक आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.