देवणी ( लातूर ) : तालुक्यात मान्सून परतीच्या पावसाने कहर केला असून तालुक्यात आजपर्यंत सरासरी ८८६.६६ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून पावसाची टक्केवारी ही १०९.७७ टक्के इथपर्यंत पोहोचली आहे. पावसाने तालुक्याचे सरासरी पर्जन्यमानाची आठशे मिलिमीटरची सीमा ओलांडली आहे.
काल तालुक्यातील बोरोळ या महसूल मंडळात 155 मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस होऊन ढगफुटी सदृश्य परिस्थिती झाली आहे. या पावसामुळे मौजे बोरोळ येथील एक पाझर तलाव पण फुटला आहे. तर धनेगाव येथील उच्चस्तरीय बंधाऱ्यास गळती लागली आहे. शिवाय तालुक्यातील नवे जुने रस्ते उखडल्याने व नाल्यांना पाणी आल्याने ग्रामीण भागातील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
या पावसामुळे तालुक्यातील सोयाबीन या मुख्य पिकाच्या काढणीला मोठा फटका बसत आहे. मात्र, या परतीच्या पावसाने तालुक्यातील मांजरा व देव आणि मानमोडी या नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय तालुक्यातील धनेगाव उच्चस्तरीय बंधारा भोकनी मध्यम प्रकल्प यांच्यासह साठवण व पाझर तलाव आणि विहिरी व बोर यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.