लातूर: राज्यातील साखर उद्योगात नावलौकिक असलेल्या लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर परिवारातील १० साखर कारखान्याकडून चालु गळीप हंगामात २४ जानेवारी पर्यंत ३० लाख ६८ हजार ९३७ मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करण्यात आले आहे. त्यातून २९ लाख ४५ हजार ९७० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. परिवारातील कारखाने अधिक क्षमतेने सुरू असल्याने दैनंदीन साधारणतः ४० ते ४५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे.
चालू गळीप हंगामात २३ जानेवारी अखेर परिवारातील मांजरा साखर कारखाना ३ लाख ७१ हजार ८७० मेट्रिक टन, विकास सहकारी साखर कारखाना निवळी ३ लाख ६५ हजार ४००, विलास साखर कारखाना तोंडार २ लाख ९१ हजार ०३०, रेणा साखर कारखाना ३ लाख ३ लाख ९ हजार ७९०, जागृती शुगर ३ लाख ६९ हजार ८१० , ट्वेण्टी वन शुगर मळवटी ३ लाख २६ हजार ७२६ , ट्वेंटी वन शुगर सोनपेठ ५ लाख २ हजार ५८० , ट्वेंटी वन शुगर लोहा १ लाख ४२ हजार ४८६ , मारुती महाराज साखर कारखाना १ लाख २२ हजार २४५ तर मंगरूळ जिल्हा धाराशिव येथील मांजरा शुगर प्रा. ली. या साखर कारखान्याने २ लाख ६६ हजार ८३० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. आजवर परिवारातील एकूण १० साखर कारखान्याकडून ३० लाख ६८ हजार ९५७ मेट्रिक टन उसाचे विक्रमी यशस्वी गाळप झाले आहे
विश्वासाची परंपरा जोपासली...लोकनेते विलासराव देशमुख यांनी ३८ वर्षापूर्वी या मांजरा साखर कारखान्यापासून प्रारंभ केला. साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी चालले पाहिजे हा संकल्प त्यांनी केला होता त्याच पद्धतीने माजी मंत्री मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी सूक्ष्म नियोजन करीत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करीत उसाला अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मंत्री आ. अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख यांच्या नेतृत्वात मांजरा साखर परिवारातील कारखाने सक्षमपणे चालविले जात आहेत.
अधिक क्षमतेने होतेय गाळप...यंदाच्या गळीत हंगामात मांजरा साखर परिवारातील सर्व साखर कारखाने अधिक क्षमतेने चालविले जात आहेत. उसाचे गाळप करीत असून त्यासाठी प्रत्येक कारखाना पातळीवर संचालक मंडळ व प्रशासन जास्तीत जास्त उसाचे लवकर गाळप होईल यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली.