लातूर : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलवर शिक्षकांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार लातूर जिल्ह्यास ५५ शिक्षक मिळाले असून, सोमवारी ५१ शिक्षकांना सीईओ अनमोल सागर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
मागील अनेक वर्षापासून शिक्षक भरती झालेली नव्हती. त्यामुळे राज्य शासनाने शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविली असून, लातूर जिल्ह्यातून ८० रिक्त जागांची माहिती पवित्र पोर्टलवर भरण्यात आली. त्यानुसार पहिल्या यादीत ५५ प्राथमिक पदवीधर शिक्षकांची निवड झाली असून, ४ मार्च रोजी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. तर सोमवारी जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, बाबासाहेब पवार, कक्ष अधिकारी हिरागीर गिरी, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप हैबतपुरे, संजीव पारसेवार, अशोक माळी यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने ५१ प्राथमिक पदवीधर शिक्षकांना समुपदेशनाने नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये लातूर तालुक्यात ७, औसा तालुक्यात ६, अहमदपूर ७, निलंगा १३, शिरुर अनंतपाळ २, देवणी २, जळकोट २, उदगीर ४, चाकूर ५ आणि रेणापूर तालुक्यात ३ प्राथमिक पदवीधर अशा एकूण ५१ जणांना नियुक्ती देण्यात आली आहे.
चार जणांनी नियुक्तीस दिला नकार...जिल्हा परिषदेने ८० रिक्त जागांची माहिती पवित्र पोर्टलवर भरली होती. त्यात ५५ शिक्षकांची पवित्र पोर्टलवर निवड झाली आहे. यातील ५१ जणांना नियुक्ती देण्यात आली असून, ४ जणांनी नियुक्ती घेण्यात नकार दिला आहे. ५१ शिक्षक हे प्राथमिक पदवीधर असून, ते गणित आणि विज्ञान विषय शिकविणार आहे. त्यामुळे बहूतांश शाळांना गणित आणि विज्ञान या दोन विषयांचे शिक्षक मिळाले आहेत. दरम्यान, नियुक्ती दिलेल्या शिक्षकांना आठवडाभरात संबधित शाळेवर हजर रहावे लागणार आहे