लातूर : हातउसणे म्हणून घेतलेले पैसे वारंवार मागूनही परत मिळत नसल्याच्या कारणातून, हाेणाऱ्या त्रासाला कंटाळून लातुरातील एका व्यापाऱ्याने आखरवाई शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ नाेव्हेंबरराेजी रात्री घडली. याबाबत गातेगाव पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश्वर किसनराव सनतनसे (वय ३९, रा. सद्भावना नगर, औसा राेड, लातूर) असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, मयत सिद्धेश्वर सनतनसे यांचा लातुरात व्यापार आहे. त्यांनी वेळाेवेळी डाॅ. अण्णासाहेब बिराजदार आणि सचिन कल्याणी यांना हातउसणे म्हणून पैसे दिले हाेते. टप्प्या-टप्प्याने दिलेली रक्कम तब्बल ३ काेटी ३० लाखांवर गेली. यातील सर्वाधिक रक्कम डाॅ. अण्णासाहेब बिराजदार यास २ काेटी ८५ लाख तर सचिन कल्याणी याला ४५ लाख रुपये दिली हाेती. दरम्यान, याबाबतची नाेंद आणि पुरावा मयत सिद्धेश्वर यांच्याकडे नव्हता. असे समाेर आले आहे. ही रक्कम त्यांनी अनेकदा या दाेघांना परत मागितली. मात्र, आज देताे, उद्या देताे म्हणून त्यांनी रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली. अखेर यातून हाेणाऱ्या त्रासाला कंटाळलेले व्यापारी सिद्धेश्वर सनतनसे यांनी आपल्या आखरवाई शिवारातील शेतात ७ नाेव्हेंबरराेजी रात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनास्थळी गातेगाव ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याबाबत देण्यात आलेल्या तक्रारीवरून गातेगाव पाेलिस ठाण्यात डाॅ. अण्णासाहेब बिराजदार (रा. आदर्श काॅलनी, लातूर) आणि सचिन कल्याणी (रा. सद्भावना नगर, औसा राेड, लातूर) या दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक ज्ञानदेव सानप करत आहेत.
तर खिशामध्ये आढळली चिठ्ठी...
मयत सिद्धेश्वर सनतनसे यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. यामध्ये त्यांनी डाॅ. अण्णासाेब बिराजदार आणि सचिन कल्याणी यांची नावे लिहिली आहेत. या दाेघांना आपण ३ काेटी ३० लाख रुपये उसणे म्हणून दिले हाेते. ते परत मिळत नसल्याने हाेणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समाेर आले आहे, असे सहायक पाेलिस निरीक्षक सानप म्हणाले.