लातूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा बाजार समित्यांमध्ये शेतीमालाला अधिक भाव मिळत असल्याने हमीभाव खरेदी केंद्र यंदा ओस पडले आहेत. सोयाबीन आणि तूर विक्रीसाठी जवळपास २७०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, प्रत्यक्षात एक रुपयाच्याही शेतमालाची शेतकऱ्यांनी सदरील केंद्रावर विक्री केली नाही. त्यामुळे वर्षभरात खरेदी शून्य आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी आधारभूत किंमत जाहीर करण्यात येते. यंदाच्या वर्षासाठी सोयाबीनचा हमीभाव ३ हजार ८०० रुपये, तूर ६ हजार रुपये आणि हरभऱ्याचा ५ हजार १०० रुपये असा दर आहे. गत खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी राशी केल्यानंतर विक्री केली. सुरुवातीस दर कमी राहिला. मात्र, त्यानंतर उत्पादनात घट झाल्याने आणि बाजारपेठेत मागणी वाढल्याने दरात वाढ झाली. फेब्रुवारीत तर सोयाबीनला दररोज उच्चांकी भाव मिळत आहे. शनिवारी कमाल दर ४ हजार ९६४, सर्वसाधारण ४ हजार ८७० आणि किमान ४ हजार १७१ रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला.
तुरीची सध्या आवक घटली असून कमाल दर ७ हजार ३०, सर्वसाधारण ६ हजार ७५० आणि किमान ५ हजार ७०१ रुपये असा मिळाला आहे. तसेच हरभऱ्याची आवक वाढत असून ४ हजार ७५० रुपये असा सर्वसाधारण भाव मिळत आहे.
तुरीसाठी २७०० जणांची नोंदणी...
नाफेडच्या आधारभूत खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी २ हजार तर तूर विक्रीसाठी २ हजार ७०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, बाजारपेठेत हमीभावपेक्षा अधिक दर मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, यंदा एक रुपयाचीही खरेदी होऊ शकली नाही, असे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय. ई. सुमठाणे यांनी सांगितले.
नाफेडची यंत्रणा बसूनच...
दरवर्षी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची शेतमाल विक्रीसाठी गर्दी असते. जिल्ह्यात १६ केंद्र होते. परंतु, यंदा बाजारपेठेत अधिक दर असल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनीही शेतमालाची विक्री केली नाही. त्यामुळे यंत्रणा बसून आहे.
हरभऱ्याच्या नोंदणीस सुरुवात...
१५ फेब्रुवारीपासून हरभरा विक्री नोंदणीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. लवकरच खरेदीस सुरुवात होणार आहे.