लातूर: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आयएमएथॉन स्पर्धा ३ मार्च रोजी होणार आहे. यासाठी राज्याच्या विविध भागातून १ हजार ४९५ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. स्त्री शक्तीचा विजय असो, हे स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे. महिला स्पर्धकांची संख्या जवळपास ५०० असल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
डॉ. राठी म्हणाले, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्री शक्तीचे सक्षमीकरण आणि समानता अशी स्पर्धेची थीम ठेवण्यात आली आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. लातूरमध्ये होणारी ही एकमेव हाफ मॅरेथॉन आहे. लातूरकरांच्या उत्तम आरोग्यासाठी आयएमएकडून विविध उपक्रम राबविले जातात. या स्पर्धा ३, ५, १०, २१ किलोमीटरसाठी होणार आहेत. विजेत्यांना रोख रक्कम, मेडल दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी लातूर अर्बन को.ऑप.बँकेसह इतर विविध संस्था, उद्योजकांनी सहकार्य केले. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमास क्रीडा मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आ. अमित देशमुख, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. विक्रम काळे, आ. अभिमन्यू पवार, आ. धीरज देशमुख, आ. रमेश कराड यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले.
पत्रपरिषदेस लातूर अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन रमण मालू, आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार, सचिव डॉ. आशिष चेपुरे, वुमन्स विंमगच्या अध्यक्षा डॉ. प्रीती बादाडे, सचिव डॉ. प्रियंका राठोड, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. आरती झंवर, डॉ. चाँद पटेल, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. विक्रम सारडा, डॉ. सतीश हंडरगुळे, डॉ. कानडे, डॉ. शीतल ठाकूर आदींची उपस्थिती होती. यावेळी स्पर्धेचे टोपी, टी-शर्टचे अनावरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकही धावणार...
मॅरेथाॅन स्पर्धेत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलिस उपाधीक्षक भागवत फुंदेही धावणार आहे. स्पर्धेचा प्रारंभ आणि शेवटही बिडवे लॉन्स येथे होणार आहे. येथून खाडगाव चौक, पीव्हीआर चौक, नवीन रेणापूर नाका मार्गावर होणाऱ्या स्पर्धेसाठी महापालिका, शहर वाहतूक शाखेचे सहकार्य लाभणार आहे. शिवाय, या मार्गावर चार रूग्णवाहिकी, पाण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे. ३ मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल, असे डॉ. राठी यांनी सांगितले.