लातूर : जिल्ह्यातील निलंगा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून एक अल्पवयीन मुलगी २०२१ मध्ये हरवली हाेती. दरम्यान, तिच्या शाेधासाठी स्थानिक पाेलिस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या वतीने गत वर्षभरापासून शाेधमाेहीम हाती घेण्यात आली हाेती. या माेहिमेला अखेर यश आले असून, मुलीचा पुणे येथे शाेध लागला आहे.
पाेलिसांनी सांगितले, निलंगा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून एक अल्पवयीन मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दाखल केली हाेती. त्यानंतर निलंगा पाेलिस ठाण्यात ७ डिसेंबर २०२१ राेजी कलम ३६३ भादंविप्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. याबाबत पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अनेक दिवसांपासून हरवलेल्या, अपहरण करण्यात आलेल्या मुलींचा शाेध घेण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर पाेलिस पथके सक्रिय झाली. शिवाय, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकही शाेध माेहिमेवर हाेते. गुन्ह्याचा तपास करताना अपहरण झालेल्या मुलींचा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊन शोध घेतला. त्याचबराेबर सायबर सेल, लातूरच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे या मुलींचा शोध घेतला गेला. मुलीस पुणे येथून ताब्यात घेत निलंगा पाेलिस ठाण्यात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा निलंगा पाेलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकाने केला समांतर तपास...पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलिस निरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांनी आपल्या पथकामार्फत या गुन्ह्यांचा समांतर तपास केला.