रेणापूर ( लातूर) : तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची चांगली हजेरी आहे. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्प ६४.३१ टक्के भरला असून, शेतकऱ्यांची व नागरिकांची चिंता मिटली आहे. परतीच्या पावसाला काही दिवस बाकी असताना त्याअगोदरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
रेणापूर तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाला. दरवर्षी परतीच्या पावसामध्ये रेणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. याच काळात जास्त प्रमाणात जलसाठा झाल्यास पाण्याची क्षमता पाहून धरणातून रेणा नदीपात्रात पाणी सोडले जाते. मात्र गतवर्षी संपूर्ण पावसाळात व परतीचा पाऊस पडला नाही. त्यामुळे मध्यम प्रकल्पात कमी जलसाठा होता. मध्यम प्रकल्पात यंदा जुनपर्यंत केवळ १.५ टक्के जलसाठा होता.
रेणापूर तालुक्यात तसेच प्रामुख्याने धरण क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने पाण्याची २१ टक्क्याने पाणी पातळी वाढला होती. त्यानंतर पाऊस पडत गेल्याने जलसाठ्यात वाढ होत गेली. २४ जुलैला ३१.१५ टक्के जलसाठा झाला. पुन्हा २४ व २५ जुलै रोजी तालुक्यात व प्रकल्प क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने या प्रकल्पात एक दिवसात पंधरा टक्क्याने पाणी वाढवून हा प्रकल्प २६ जुलैच्या सकाळी दहा वाजेपर्यंत ५१.९२ टक्के भरला आहे. अधून-मधून पावसाच्या सरी बरसत असल्याने प्रकल्पात पाण्याचा येवा सुरुच आहे. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत प्रकल्पात ६४.३१ टक्के साठा झाला आहे. प्रकल्प भरत असल्याने रेणापूर तालुक्यातील अर्ध्या गावांची तसेच अंबाजोगाई तालुक्यातील काही गावांच्या पाणीपुरवठा योजनेची चिंता मिटली असून, याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्यासाठी फायदा होणार आहे. दरम्यान, अद्याप परतीचा पाऊस बाकी असल्याने आगामी काळात पाण्याची आवक पाहता रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे.
परिसरात उसाच्या क्षेत्रात वाढ होणार....रेणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला तर या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पानगाव, भंडारवाडी, कामखेडा, रामवाडी, फावडेवाडी, वाला, वालेवाडी, घनसरगाव, रेणापूर आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. प्रकल्प ६४ टक्के भरल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करू शकतात. खरीप हंगाम संपल्यावर ऊसाची लागवड वाढण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पाणीसाठा चांगला झाल्याने पिण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
रेणापूर मध्यम प्रकल्प सद्यस्थिती...रेणा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १३.२२० दलघमी असून, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी आहे. एकूण पाणीसाठा १४.३५० दलघमी असून, पाण्याची टक्केवारी ६४.३१ असल्याची माहिती रेणा प्रकल्प शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली. जुनच्या सुरुवातीला प्रकल्पात केवळ १.५ टक्के पाणीसाठा होता. मात्र, ८ जुनपासून सुरु झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.