- बालाजी कटके रेणापूर ( लातूर ): रेणा मध्यम प्रकल्प हा शंभर टक्के भरला असून गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मंगळवारी दोन दरवाजे तर आज सकाळी दोन असे चार दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. रेणा नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड व शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात व रेणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून आवक वाढल्याने मंगळवारी २ दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला . दरम्यान, आवक वाढत गेल्याने आज सकाळी पुन्हा दोन दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला. यामुळे रीना नदी दुधडी भरून वाहत आहे. तसेच या नदीवर असलेले घनसर गाव रेणापूर व खरोळा हे तिन्ही बॅरेजेस तुडूंब भरून वाहत आहेत. नदीपात्रात पाणी सोडण्याची आतापर्यंतची ही दहावी वेळ आहे. या दोन ते तीन महिण्यात जवळपास १२.०६४ दलघमी पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. सध्या चार दरवाज्यातून एकूण विसर्ग १२६५ क्युसेक्स सुरु आहे.
रेणा मध्यम प्रकल्पातील सध्याची स्थिती जिवंत पाणीसाठा २०.५५६ दलघमी,मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी,एकूण पाणीसाठा २१.६८५ दलघमी,पाणीसाठा टक्केवारी १०० %,पाणीपातळी ६०८.५० मी द्वार उघडल्याची सदयस्थिति ऊंची सेमी ,द्वार क्र १.१० सेमी, द्वार क्र २ बंद, द्वार क्र ३.१० सेमी, द्वार क्र ४.१० सेमी, द्वार क्र ५ बंद , द्वार क्र ६.१० सेमी एकूण विसर्ग ३५.८४ क्युमेक्स, १२६५ क्युसेक्स