लातूर - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा दुष्काळमुक्ती, नदीजोड प्रकल्प करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोळंगे आणि करुणाताई मुंडे यांच्या नेतृत्वात रेणापूर ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी संघर्ष यात्रेला रविवारी प्रारंभ झाला.
रेणापूर येथील श्रीराम विद्यालयाच्या समोरून यात्रेला सुरूवात झाली. यावेळी प्रभाबाई नागरगोजे यांच्या हस्ते करुणाताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. तर शेतकरी देडे यांच्या हस्ते गजानन बोलंगे यांचा सत्कार केला. यावेळी धीरज मुंडे, सोनाली गुळभिले यांची उपस्थिती होती. मुंबई येथे ही संघर्ष यात्रा पोहचल्यानंतर आझाद मैदानावर उपोषण करण्यात येणार असून त्यानंतर मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बाेळंगे यांनी सांगितले. या संघर्ष यात्रेत १२ शेतकऱ्यांचा सहभाग आहे. तर ३ वाहने आहेत. संघर्ष यात्रा १५ दिवसानंतर मुंबईत पोहचणार आहे. रेणापूर, पिंपळफाटा, अंबाजोगाई, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे मार्गे मुंबई दाखल होणार आहे. आंदोलनात अच्युत करमुडे, दत्तात्रय शिंगाडे, अमोल गोडभरले, इलाही शेख, राजकुमार नागरगोजे, संतराम चिकटे, राजकुमार तिडके, दशरथ निंगवारे, माधव चोपडे, प्रविण चिकटे, गोविंद आवळे, राजू नागरगोजे यांचा सक्रिय सहभाग आहे.