रेणापूर : तालुक्यात शनिवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाले, ओढे भरून वाहत आहेत. दरम्यान, तालुक्यातील रेणापूर, पोहरेगाव, कारेपूर, पळशी महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यात २४ तासांत ७४.९ मिमी पाऊस झाला आहे. रेणा मध्यम प्रकल्पातही यामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
रेणापूर शहरासह तालुक्यात शनिवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासभर मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यानंतर काहीवेळ पावसाने विश्रांती घेऊन पुन्हा ७.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपले. रात्रभर संततधार पाऊस सुरु होता. तालुक्यातील रेणापूर महसूल मंडलात रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ९०.३, पोहरेगाव मंडलात ७५.३, कारेपूरमध्ये ८५.५, पळशी मंडलात ७५.५ मिमी पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. तालुक्यात २४ तासांत एकूण सरासरी ७४.९ मिमी पाऊस झाला. तालुक्यात आतापर्यंत ७३७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील रेणापूर, घनसरगाव, खरोळा, कासारगाव, पोहरेगाव, साई हे बॅरेजेस तुडुंब भरुन वाहत आहेत. दरम्यान, दर्जी बोरगाव शिवारातील गॅबियन बंधारा पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. सेवादास नगर, हनुमंतवाडी, कामखेडा रोडवरील छोट्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती. खलंग्री येथील साठवण तलाव भरला आहे. रेणा मध्यम प्रकल्पात जलसाठा वाढला असून, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा आहे.
प्रकल्पानजीकच्या गावांना दक्षतेचा इशारा...
रेणा मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग व महसूल प्रशासनाच्यावतीने या प्रकल्पाच्या परिसरातील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही क्षणी प्रकल्प भरल्यानंतर दरवाजे उघडून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार राहुल पाटील, रेणा मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी केले आहे.
पाणी घुसल्याने कुटुंबीयांची धांदल...
शहरातील संजयनगर, राजेनगर, बसस्थानकाच्या पाठीमागील वस्ती, चांदणी चौक, मुख्य बाजारपेठ, दत्त मंदिर, यलम गल्ली रस्ता, मुस्लिम स्मशानभूमीचा रस्ता या भागात पावसाचे पाणी साचले होते. तसेच संजयनगर, राजेनगर भागातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची धांदल उडाली होती. त्यामुळे रात्र जागून काढावी लागली.
१५ दिवसात दुसऱ्यांदा अतिवृष्टी...
रेणापूर महसूल मंडलात १५ दिवसात दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली आहे. यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी १५० मिमी तर शनिवारी रात्री ९०.३ मिमी पाऊस झाला. रेणा प्रकल्पात दुपारी १ वाजेपर्यंत जिवंत पाणीसाठा १४.६३ दलघमी तर एकूण पाणीसाठा १५.७६३ दलघमी म्हणजे ७१.१९ टक्के झाला आहे.