शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील मुख्य विद्युत वाहिनीचा खांब झुकला होता. त्यामुळे शेतातील मशागतीची कामे करताना विद्युत तारांचा धोका निर्माण झाला होता. दुरूस्तीसाठी शेतकरी सहा महिन्यांपासून महावितरण कार्यालयास खेटे घालत होता. यासंदर्भात लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच महावितरणने त्याची दखल घेत शनिवारी झुकलेल्या खांबाची तत्काळ दुरूस्ती केली.
तालुक्यातील दैठणा येथील शेतकरी बालाजी सामनगावे यांच्या शेतातून शेंद गावासाठी मुख्य विद्युत वाहिनी गेली आहे. परंतु, परतीच्या वादळी पावसात या विद्युत वाहिनीचा एक खांब झुकला होता. लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे शेतातील मशागतीची कामे करताना शेतकऱ्याच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. या विद्युत खांबाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी सामनगावे सहा महिन्यांपासून महावितरणकडे करीत होते. परंतु, महावितरणकडून दुरूस्ती करण्यात आली नव्हती. जीव मुठीत घेऊन शेतकरी, शेतमजुरांना शेतात मशागतीची कामे करावी लागत होती. याबाबत लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच महावितरणचे सहाय्यक अभियंता जोंधळे यांनी दखल घेऊन महावितरणच्या दुरूस्ती पथकाकडून सदरील विद्युत खांबाची तत्काळ दुरूस्ती केली आहे. या पथकात गुंडेराव अब्दुलपुरे, लाईनमन अजय भद्रे, मैनोद्दीन तांबोळी आदींचा समावेश होता.
दुरूस्ती कामास प्राधान्य...
महावितरणचे सहाय्यक अभियंता जोंधळे म्हणाले, तालुक्यातील विद्युत वाहिनीच्या दुरूस्ती कामाला प्राधान्यक्रम देण्यात येत असून, लवकरात लवकर दुरूस्तीची कामे केली जातील.