चाकूर (जि. लातूर) : दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य वाहतूक नियोजन व्यवस्थापक डी. नागिया हे लातूररोड येथील रेल्वे स्थानकातील मंजूर असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आले होते. तेव्हा लातूररोड, वडवळ नागनाथ येथील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन दोन्ही स्थानकातील विविध समस्या मांडल्या.
यावेळी डी. नागिया यांच्यासोबत वडवळ नागनाथ येथील रेल्वे विभागीय परिचालन व्यवस्थापक श्रीकांत मलेला, वाहतूक निरीक्षक दीपक जोशी, लातूररोड येथील व्यवसायिक निरीक्षक संतोष चिगळे, स्टेशन मास्तर आर. धनराज उपस्थित होते. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य वाहतूक नियोजन व्यवस्थापक डी. नागिया यांच्यासमोर रेल्वे स्थानकातील विविध अडचणी मांडून समस्यांचे निवेदन शिष्टमंडळाने दिले.
येथे स्टेशन मास्तरची नियुक्ती करावी. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो, भाजीपाला उत्पादित केला जातो. देशातील मोठ्या बाजारपेठेत हा शेतमाल पाठविण्यासाठी किसान स्थानकावर सर्व मुलभूत, भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच तशी रेल्वे सुरु करावी. लातूर- नांदेड महामार्गावरील लातूररोड येथून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठ्ठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना पायी चालणेही कठीण झाले आहे. हा रस्ता हॉटमिक्स करावा. स्थानकावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. फलाटावर रेल्वे डबा थांबतो, तिथे बोगी क्रमांक दिसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सिद्धेश्वर अंकलकोटे, संतोष आचवले, भरतसिंह ठाकूर, वैभव रेकुळगे, शिवशंकर टाक, ज्ञानेश्वर बेरकिळे यांनी केली. या समस्या जाणून घेत त्या लवकरच सोडविण्यात येतील, असे आश्वासन डी. नागिया यांनी शिष्टमंडळास दिले.