- हरी मोकाशेलातूर : महिलांचा सन्मान वाढावा तसेच ग्रामविकास प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी जिल्ह्यात ग्राम राजस्व अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आता जिल्ह्यातील प्रत्येक घरांच्या नोंदी पती- पत्नीच्या नावाने होणार आहेत.
शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. त्यामुळे सामान्य नागरिकांचा योजना, कामानिमित्ताने ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेशी नियमित संबंध येतो. त्यामुळे वारंवार भेटी द्याव्या लागतात. अनेकदा नागरिकांना विनाकारण मानसिक त्रास होतो. परिणामी, तक्रारी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे ग्रामविकास विभागाअंतर्गत प्रशासन लोकाभिमुख, गतिमान व सुलभ होण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यात ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या अभियानअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती डिजिटल करण्यात येऊन ग्रामपंचायतस्तरावरील सर्व दाखले लवकर देण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतींच्या नोंदी, वारस नोंदी, ग्रामपंचायत नमुना क्र. ८ वरील मिळकतीच्या नोंदी पती- पत्नी यांच्या संयुक्त नावावर करण्यात येणार आहेत. या नोंदीसंदर्भात ग्रामपंचायत स्तरावर अर्ज घेऊन त्याची छाननी करण्यात येणार आहे. तसेच हरकती मागवून गावातच सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीचे सर्व कर मार्चअखेरपर्यंत वसूल करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात ५ लाखापर्यंत मालमत्ता...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जवळपास ५ लाखापर्यंत घर, प्लाॅटची संख्या आहे. हे अभियान २५ जानेवारी २०२४ पर्यंत राबविण्यात येणार असून सर्व घरे पती- पत्नीच्या नावाने करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
महिलांचा सन्मान वाढणार...जिल्ह्यातील बहुतांश घरे, प्लाॅट हे पुरुषांच्या नावे आहेत. आता या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरे, प्लॉटच्या नोंदी पतीबरोबरच पत्नीच्या नावाने होणार आहेत. या अभियानातून महिला सक्षमीकरणबरोबरच महिलांचा आत्मसन्मान वाढणार आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत या नोंदी पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, त्यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.