लातूर : मराठा क्रांती मोर्चाची लढाई आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे. ९ आॅगस्ट रोजी ‘क्रांती दिनी’ महाराष्ट्र बंद करण्याचे ठरले आहे. राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून यावर शिक्कामोर्तब होईल, असा निर्णय रविवारी जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा क्रांती भवनात झालेल्या बैठकीला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात आतापर्यंत ५८ मोर्चे काढले; परंतु, सरकारने जाहीर केलेल्या सवलतीतून काहीच पदरी पडले नाही. शासनाने केवळ दिशाभूल करून वेळ मारुन नेली आहे. त्यामुळे आता मूक मोर्चा न राहता ठोकपणे उत्तर देण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या भूमिकेचा संतप्त शब्दांत अनेक युवक कार्यकर्त्यांनी समाचार घेतला. शिवनीती (गनिमीकावा) या तंत्राने व जाहीरपणे आंदोलने करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ९ आॅगस्ट २०१६ रोजी औरंगाबादेतून मराठा क्रांती मूक मोर्चास सुरुवात झाली होती. ‘भारत छोडो, करो या मरो’ या निश्चयाचा वस्तुपाठ असलेली आॅगस्ट्र क्रांतीही याच दिवशी सुरू झाली होती. त्यामुळे या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून महाराष्ट्र बंदसाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्ये, तालुक्यांतील नागरिकांना अवगत करून हे आंदोलन ऐतिहासिक करण्याचे यावेळी ठरले.
लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाच्या प्रश्नांप्रती बाळगलेल्या मौनाबाबत तरुणांनी या बैठकीत संताप व्यक्त केला. स्वार्थासाठी सोयीपुरता वापर करणाºया स्वकियांनीच समाजाचे वाटोळे केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. त्यांना जागा दाखवा, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले. बैठकीला समाज बांंधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.