आशपाक पठाण/
लातूर : पेट्रोल, डिझेलबरोबरच घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅसचे दर भडकल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. आधीच कोरोनाने अनेकांचे रोजगार बंद पाडले आहेत. त्यातच वाढलेल्या गॅसच्या किमतीने स्वयंपाकघरातील जेवणावरही बंधने आणल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी गॅसच्या किमती दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान वाढल्या आहेत. त्यातच सबसिडीच्या नावाखाली सात-आठ रुपयेच खात्यावर येत असल्याने गॅसच्या मूळ किमतीमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट आहे. यावर्षी जानेवारी ते जुलैपर्यंत गॅसच्या किमतीत शंभर ते दीडशे रुपये वाढ झाली आहे. ग्रामीण भागात चुलीचा पर्याय असला तरी पावसाळ्यामुळे सरपणही ओले राहत असल्याने चूल पेटत नाही अन् गॅस महाग झाल्याने पेटवू वाटत नाही, अशी भावना ग्रामीण भागातील गृहिणींमधून व्यक्त होत आहे.
गावांत पुन्हा पेटतील...
गॅसच्या किमती आमच्या हाताबाहेर चालल्या आहेत. सहाशे रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर साडेआठशे रुपयांना झाला आहे. त्यात पुन्हा सबसिडीच्या नावाने बोंबाबोंबच आहे. लाभार्थ्यांना सबसिडीच्या नावाखाली पाच-सात रुपये दिले जात आहेत. ही एकप्रकारची कुचेष्टाच आहे.
कोरोनाच्या संकटामुळे पुरेसा रोजगार नाही. त्यात मिळाला तरी पुरेसे उत्पन्न नाही. त्यातच महागाईने प्रचंड बेजार केले आहे. अशास्थितीत गॅस दरवाढीची भर पडली आहे.
त्यामुळे पुन्हा चुली पेटविण्याची तयारी गृहिणींनी सुरु केली आहे. गॅसच्या किमती अशाच वाढू लागल्या तर ग्रामीण भागात त्याचा वापर जवळपास बंदच होऊन जाईल. -विद्याताई आवाड, गृहिणी, गादवड.
घर खर्च भागवायचा कसा
कोरोनाने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण केला असताना सरकारने गॅसचे भाव वाढवून त्यात आणखी भर टाकली आहे. ही दरवाढ मागे घेऊन सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.
- पंचशील डावकर, सामाजिक कार्यकर्त्या, लातूर
गॅसची सबसिडी एकदम कमी केली आहे. त्यामुळे सरकारने एकतर दर कमी करावेत तसेच सबसिडी वाढवून द्यावी. लोकांच्या उत्पनात कोरोनामुळे फरक पडला असल्याने गॅस खरेदी करावा की नाही? असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. - सुनंदा माने, गृहिणी
डिसेंबर महिन्यात उच्चांकी वाढ
गेल्या वर्षभरात गॅसचे दर सातत्याने बदलत राहिले आहेत. या कालावधीत घरगुती गॅसच्या किमतीत एकाचवेळी ७७ रुपयांची दरवाढ ही डिसेंबर २०२०मध्ये झाली. त्यानंतर यावर्षी मार्चमध्येही जवळपास ७० रुपयांची वाढ झाली.