लातूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, ८१८ गाव-वाडी-तांड्यांवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १६ हजारांवर रुग्ण आहेत. यातील लातूर मनपा हद्दीतील ५ हजार २४ रुग्ण वगळले तर उर्वरित ११ हजार १२४ रुग्ण तालुके आणि गावस्तरावरील आहेत. लातूर शहर वगळता आतापर्यंत ग्रामीण भागात ५९२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
कोरोनाचा सध्या हाहाकार असून, फक्त ९५ गाव-वाडी-तांड्यांना कोरोनाला वेशीवर रोखण्यात यश मिळाले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने औषध, ऑक्सिजन, बेडची कमतरता जाणवत आहे. दररोज साडेतीन हजारांच्या वर ऑक्सिजन सिलेंडरची गरज भासत आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी आहे. ग्रामीण भागात कोरोनासंबंधी नियमांचे पालन होत नसल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत सर्वाधिक रुग्णसंख्या उदगीर तालुक्यात ६६०५ रुग्ण आढळले असून, सद्य:स्थितीत १८५१ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १२४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ अहमदपूर तालुक्यात ५ हजार ५२२ रुग्ण आतापर्यंत आढळले असून, सद्य:स्थितीत १५३६ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत ७० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. लातूर तालुक्यात ६०५० रुग्ण आढळले आहेत.
ऑक्सिजन, रेमडेसिविरची कमतरता
जिल्ह्यातील सर्वच कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता आहे. पुरवठा कमी झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्ण, नातेवाईकांची ससोहोलपट होत आहे. कुठे ऑक्सिजन बेड मिळेल का, या संदर्भातची विचारणा जिल्ह्यासह स्थानिक वाॅर रुमकडे केली जात आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडाच असून, रुग्ण नातेवाईक त्रस्त आहेत.