लातूर: शहरातील गंजगाेलाई परिसरात रस्त्यावरच ठाण मांडत रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या, अतिक्रमण करणाऱ्याविराेधात लातूर शहर वाहतूक शाखा आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून साेमवारी सायंकाळी दंडात्मक कारवाई करून हातगाडे जप्त करण्यात आले आहेत.
लातुरातील गंजगाेलाई परिसरात सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांसह भाविकांची माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेत आहे. शिवाय, लातुरातील प्रमुख बाजारपेठ असल्याने सायंकाळच्या सुमारास या परिसरात खरेदीसाठी ग्राहकांची माेठी गर्दी असते. परिणामी, वाहनांची गर्दी आणि पार्किंगची समस्या निर्माण हाेत असल्याने मनपाच्या वतीने स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावर वाहने, हातगाडे थांबवू नये, असे वारंवार पाेलिसांकडून आवाहन केले जात आहे.
मात्र, काही जणांकडून रस्त्यावरच वाहने थांबविणे, हातगाडे थांबवून रहदारीला अडथळा निर्माण केला जात असल्याचे समाेर आले. अशांवर साेमवारी सायंकाळी लातूर शहर वाहतूक शाखा आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. एकूण १५ हातगाडे जप्त करण्यात आले असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, अशी माहिती पाेलिसांनी दिली.
सहा महिन्यामध्ये १२५ हातगाडे जप्त...लातुरातील प्रमुख मार्गावर हातगाडा चालकांकडून रहदारीला अडथळा निर्माण केला जात असल्याचे समाेर आले आहे. अशांवर पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, गत सहा महिन्यांत १२५ हातगाडे जप्त केले आहेत. त्यांच्याकडून मनपाने ३० हजारांवर दंड वसूल केला आहे. - गणेश कदम, पाेलिस निरीक्षक, लातूर